कोकणातील शिवरायांच्या शिव वाटा | 'कोमसाप' राबवणार अभियान

शिवजयंतीदिनी करण्यात आला संकल्प
Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2023 18:03 PM
views 284  views

सावंतवाडी : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोकणातील वास्तव्य आणि गड किल्ले व या किल्ल्यावर जाण्यासाठी गावागावातून शिव वाटा याबाबतचा शिव इतिहास नव्या पिढीसमोर यावा आणि शिवरायांचा कोकणातील साहित्य रुपी इतिहास यांचा शोध घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे वर्षभरात कोकणातील शिवरायांच्या शिव वाटा पुस्तक स्वरूपात मांडण्याचा संकल्प आज शिवजयंती निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे करण्यात आला. त्यांच्या विचारांचे शिव जागर साहित्य अभियान वर्षभर राबवण्यात येणार आहे असे ठरवण्यात आले.


कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन शिवजयंती उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पाळणा सजवून त्यामध्ये शिवरायांचे शिवपुस्तक ठेवून जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाऊन जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी अर्पण केला.


यावेळी श्री. सावंत म्हणाले, महाराष्ट्राच आराध्य दैवत श्रीमंत योगी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोकणातील वास्तव्य आणि त्यांनी गड किल्ले उभारले मावळ्यांना सोबत घेऊन बारा बलुतेदार यांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केले. कोकणातील गावागावात शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे. त्या शिववाटा अजूनही साक्षी आहेत. मात्र याबाबत म्हणावा तसा इतिहास रुपी पुस्तक किंवा त्याची जनजागृती आजच्या पिढीसमोर नाही. त्यामुळे या कोकणातील शिववाटांचा इतिहास पुस्तक स्वरूपात नव साहित्य संग्रह उभा केला जाईल पुढील शिवजयंतीला कोकणातील शिवरायांच्या वाटा हे पुस्तक सादर करण्यात येईल व त्यासाठी इतिहास संशोधकांचेही सहकार्य घेण्यात येईल आणि या माध्यमातून नव्या पिढीसमोर शिवजागर अभियान राबवण्यात येईल.


यावेळी जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा होते. त्यांचे योगदान मोठे होते. त्यांची संभाजी महाराजांची साहित्य चळवळ फार मोठी होती आणि हीच साहित्य चळवळ आपण पुढे नेत आहोत. यावेळी जिल्हा खजिनदार भरत गावडे यांनी जाणता राजा शिवाजी महाराज यांचे स्मरण आणि आचरण आपण प्रत्येकाने करायला हवे असे ते म्हणाले. तालुका सहसचिव राजू तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातील वास्तव्य आणि त्यांनी ज्या पद्धतीने इतिहास रचला आणि युद्ध नीती कशी वापरली आजही युद्धनीती आर्मी व अमेरिकेतही वापरली जाते. कोकणातील त्यांचे वास्तव्य साहित्य स्वरूपात आपण मांडूया असं मत व्यक्त केले.


यावेळी ॲड. नकुल पार्सेकर, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, विनायक गांवस यांनी श्रीमंत योगी अशी पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आली होती. ते युग पुरुष होते. चारशे वर्षांपूर्वी जो इतिहास रचवला तो आजही आपण आचरणात आणत आहोत. फक्त त्यांचे स्मारक उभारून होणार नाही तर त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण त्यांचे विचार आचरणात आणायला हवे असे ते म्हणाले.  यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे अनिल गोवेकर आत्माराम परब मनीष नाईक प्रसाद परब धैर्यशील परब आदी उपस्थित होते. यावेळी छोट्या शाळकरी मुलाला छत्रपती शिवाजींचे बालपणाच्या आठवणीचे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते.