
कुडाळ : ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि पूर्वकल्पना न देता शहरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात कुडाळ शहर शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. "यापुढे जर विचारणा न करता मीटर बसवले, तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल," असा सज्जड दम शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भरला.
कुडाळ शहरामध्ये सध्या महावितरणच्या ठेकेदारांमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे मीटर बसवताना संबंधित ग्राहकाला कोणतीही सूचना दिली जात नाही. जुने मीटर सुस्थितीत असतानाही ते बदलून नवीन मीटर बसवले जात आहेत आणि त्यानंतर ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शहरातील एस.टी. बस स्थानकाजवळील दर्ग्याचा मीटर कोणालाही न सांगता बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यावर शिवसैनिकांनी उपकार्यकारी अभियंता निळकंठ यांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला समोर बोलावण्याची मागणी केली, मात्र ठेकेदाराने तेथून पळ काढला. "इतकी वर्षे जुने मीटर व्यवस्थित चालले असताना अचानक ते निकामी कसे झाले?" या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती.
यावेळी शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्यासह चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, चंदन कांबळी, राजवीर पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"ठेकेदार मुजोरी करत असून ग्राहकांना अंधारात ठेवून मीटर बदलले जात आहेत. यापुढे जर लोकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लादले, तर गाठ शिवसेनेशी आहे," अशा शब्दांत अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे. याबाबतचे निवेदनही यावेळी महावितरण प्रशासनाला सादर करण्यात आले.











