शिक्षकाच्या मागणीसाठी शिरगाव - चौकेवाडी ग्रामस्थ करणार रास्ता रोको

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 28, 2023 18:02 PM
views 88  views

देवगड : देवगड तालुक्यातील जि.प पूर्ण प्राथमिक शाळा शिरगाव- चौकेवाडी या प्रशालेतील कामगिरी काढलेल्या शिक्षकांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करा, अन्यथा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शिरगाव बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे लेखी निवेदन शिरगाव-चौकेवाडी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे गटविकास यांना दिले आहे. शिरगाव-चौकेवाडी या प्रशालेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, या प्रशालेतील एका शिक्षकाला कामगिरी म्हणून दुसऱ्या शाळेत पाठविले. त्यामुळे या प्रशालेत दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या प्रशालेतील कामगिरी काढलेल्या शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांनी यापूर्वी ऑगस्ट महिन्यात शाळाबंद आंदोलन करण्यात आले होते . यावेळी पवित्र पोर्टल मार्फत भरती झालेल्या शिक्षकांमधून या शाळेला प्राधान्याने शिक्षक दिला जाईल. तसेच या प्रशालेतील कामगीरीवर काढलेल्या शिक्षकाची नेमणूक रद्द करून पुन्हा याच शाळेत नेमणूक दिली जाईल असे गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यानी यावेळी आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

तसेच ३१ ऑगस्टला शिरगाव धोपटेवाडी शाळेतील उपशिक्षिकाची पर्यायी व्यवस्था म्हणून शिरगाव चौकेवाडी शाळेवर नियुक्ती करण्याचे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले होते.परंतु संबंधित उपशिक्षिका अद्यापपर्यंत याप्रशालेत हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शिरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी निवेदन ७ नोव्हेंबर ला देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांनी दिले आहे.