पत्रकारितेत फक्त पैसा कमवायचाय एवढंच धैय्य नको : शेखर सामंत

Edited by: विनायक गांवस
Published on: September 29, 2024 09:15 AM
views 305  views

सावंतवाडी : करिअर म्हणून पत्रकारितेत यायचं असेल तर जरूर या. पण, पैसा कमवायचाय एवढंच धैय्य ठेवू नका. आपण चौथा स्तंभ आहोत या जबाबदारीनं काम करा, स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका असं विधान तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांनी केले. सावंतवाडी येथील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

ते म्हणाले, आपली लेखणी ही एखाद्याच आयुष्य घडवू शकते  अथवा बरबाद करू शकते. त्यामुळे जबाबदारीतून लेखन करावे. पत्रकारीतेत असताना पाय जमीनीवर राहतील याची काळजी घ्यावी. पत्रकाराकडे प्रामाणिकपणा असावा, त्याच्यातील स्वाभिमान जागृत असला पाहिजे. तसेच पत्रकाराने  संवेदनशील असण आवश्यक आहे. आपली पत्रकारिता ही संदेश देणारी हवी, समाज घडवणारी असावी. या क्षेत्रात खूप मोठी ताकद आहे ‌अस मत श्री. सामंत यांना व्यक्त केले. वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम शुभारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. 


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदीर केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी रमेश बोंद्रे, अमोल टेंबकर, हरिश्चंद्र पवार, डॉ. जी.ए.बुवा, प्रा. रूपेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात गजानन नाईक यांनी  पत्रकार म्हणजे काय ? पत्रकारितेचा जन्म कसा झाला याविषयीच मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुकांना कोर्सचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, श्रीराम वाचन मंदीरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सहकार्याध्यक्ष डॉ. जी.ए. बुवा, अ.भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, केंद्र संयोजक राजेश मोंडकर, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, वाय.पी.नाईक, रवी जाधव, पत्रकार दीपक गांवकर, प्रा. रूपेश पाटील, अनिल भिसे, विनायक गांवस, भुवन नाईक, अनुजा कुडतरकर, संदीप चव्हाण, प्रसाद माधव, साबाजी परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मोंडकर तर सुत्रसंचालन मंगल नाईक-जोशी यांनी केले.