
चिपळूण : चिपळूण शहरातील नागरिकांना पावासाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच कोकणात मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगरपालिका अधिकारी, एस. टी. महामंडळ अधिकारी यांच्यासह चिपळूण शहराची पाहणी केली.
चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. चिपळूण शहरात वाशिष्टी नदीच्या पुराचे येणारे पाणी व अतिवृष्टीमुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. आमदार शेखर निकम पावसाळ्यात शहरात वाशिष्टी नदीला येणारा पूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण वाशियांना दरवर्षी होणारा त्रास कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
याच धर्तीवर,आमदार शेखर निकमांनी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण शहरातील पॉवर हाऊस, प्रांत ऑफीस, चिपळूण बी.एस.एन.एल ऑफिस, चिपळूण मार्कंंडी जिप्सी कॉर्नर, पेठमाप, बाजारपेठेत नाईक पूल, मुरादपूर गणपती मंदिर येथील पाणी निचर्याचीपाहणी केली. बहादूरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील जुना ब्रीज व गणपती विसर्जन घाट पाहणी, एन्रॉन ब्रीज दुरुस्ती पाहणी, चिपळूण एस. टी. आगार येथील आगाराची नवीन उभारण्यात येणारी इमारत व पाणी निचरा पाहणी, वांगडे मोहल्ला येथील एस. टी. निवारा शेड मारणे व पाणी निचरा यांची पाहणी केली. त्याचबरोबर खेंड महालक्ष्मीनगर व कांगणेवाडी (दुर्गाआळी) येथील दरड कोसळणे संबंधीत भागाची व कामाची पाहणी केली. आमदार शेखर निकम यांनी पाहणी केलेल्या सर्व संबंधीत ठिकाणांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.