
सावंतवाडी : आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना पाठिंबा देत आहोत अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले की, “सीमा मठकर यांना पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवारीची मागणी केली असून त्या जागांवर पुंडलिक दळवी व देवा टेमकर यांना संधी द्यावी, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासंदर्भातील बैठक नुकतीच प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादीकडून आलेल्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सीमा मठकर यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, अनुप नाईक आदी उपस्थित होते.










