
सावंतवाडी : बहुचर्चित 'शक्तिपीठ' महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित आराखडा बदलण्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. या बदलामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील तसेच बागायती भागातून जाणारा महामार्ग आता केसरी - फणसवडे मार्गे वळवण्यात येणार आहे. यामुळे सुमारे ३० किमीचा बोगदा खोदण्याची आवश्यकता टळणार आहे अशी माहिती आ. दीपक केसरकर यांनी दिली.
सिंधुदुर्गातून जाणाऱ्या महामार्गास बांदा या परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तिपीठ'चा सिंधुदुर्गातून जाणारा आराखडा बदलण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या आराखडा बदलास मंजुरी दिल्याचे आ. दीपक केसरकर यांनी सांगितले. नवीन सुधारित आराखड्यानुसार केवळ १० किलोमीटरचा बोगदा खोदून हा महामार्ग थेट मळगावला जोडता येणार आहे. या बदलामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होणार आहे. यासोबतच पर्यावरणाची होणारी संभाव्य हानीदेखील टाळता येणार आहे.
याव्यतिरिक्त, या सुधारित मार्गाची कनेक्टिव्हिटी रेडी बंदराशी होणार असल्याने, कोकागातील स्थानिक उत्पादनांना मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. येथील शेतकरी आणि व्यावसायिक मोठ्या बाजारपेठेशी जोडले जातील आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शक्तिपीठ महामार्गाच्या या नवीन आखणीमुळे कोकणच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. या बदलामुळे जैवविविधता संवेदनशील क्षेत्रातील वन्यजीवांची सुरक्षितता अधिक सुनिश्चित केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.