
सावंतवाडी : निसर्ग, पर्यावरण, कोकणावर प्रेम असणाऱ्यांनी शक्तीपीठला विरोध केला पाहिजे. हा धोका फक्त १२ गावांना नाही. याचे दिर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत अस मत कॉ संपत देसाई यांनी व्यक्त केले.
जे विरोध करतील त्यांना फटके द्यायचा इशारा इथले नेते देत आहेत. जैतापूर वेळी आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. आमचा आवाज दडपला जाणार नाही. जनता जागी होते तेव्हा काय होतं ते तुम्हाला दिसेल असंही श्री. देसाई म्हणाले. सत्तेच्या जीवावर लोकांना दडपण शक्य होणार नाही. कोल्हापूर पुढे रस्ता नेत कोणत शक्तीपीठ दर्शन यांना करायचं आहे ? तिथे कोणतं शक्तीपीठ आहे ? भावनिक नाव देण्याचा हा प्रयत्न आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ आवश्यक नाही.
शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.