
सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. हा महामार्ग व्हावा अशी राजकर्त्यांची इच्छा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बांदा- संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडीतून जाईल असे सांगितले जात आहे. मग, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या नियोजित बांदा-संकेश्वर महामार्गाचे काय झाले ? तू कुठे अडकला आहे. सह्याद्री पट्ट्याच्या भागातून शक्तीपीठ महामार्ग नेमका कोणासाठी ? असा सवाल माजी आमदार शिवराम दळवी यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाचे अनेक प्रकल्प सध्या बसनात गुंडाळले गेलेत. कोकणातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने विकासासाठी आपल्या जमिनी वारंवार देत राहायच्या का ? आणि तुम्ही मात्र काहीच करणार नाही का हे किती दिवस चालणार असा प्रश्न माजी आमदार श्री. दळवी यांनी. उपस्थित केला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. कारण, शेतकरी जमीनधारक गोरगरीब जनता यांच्या हा हिताचा रस्ताच नाही. आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही महिन्याभरापूर्वीच बांदा- संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडीत जाणार असे म्हटले होते. त्याची निविदाही झाली आहे. मग, हा महामार्ग सध्या कोठे अडकला आहे ? हा महामार्ग होत असताना आणखी शक्तिपीठ महामार्ग नेमका कोणत्या विकासासाठी ? असा सवाल त्यांनी केला आहे. राजकर्त्यांची इच्छा असेल की नागपूर ते गोवा सिंधुदुर्ग असे सर्व आध्यत्मिक स्थळे जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि विकासाचे एक केंद्र बनावे. पण, याआधी ज्यांनी जमिनी दिल्यात त्यांच्या पदरी काहीच मिळाले नाही. आता शक्तिपीठ महामार्गाला जमिनी घेणार आहात त्यातून नेमके काय साध्य होणार ? असा सवाल श्री दळवी यांनी व्यक्त करत. शक्तिपीठ महामार्ग हा जर येथील जनतेला समाधान देणारा असेल आणि विकासाला चालना देणारा असेल तर ते पटवून द्या. अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार आरोग्य आणि पर्यटन प्रकल्प हे कसे सुरु होतील त्याकडे प्राधान्य द्या असंही ते म्हणाले.