
सावंतवाडी : सालईवाडा परिसरात 'तुळजा कॉम्प्लेक्स'चे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असूनवारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेची नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दखल घेतली असून कार्यवाही करण्याची ग्वाही दिलीय.
सालईवाडा येथील बाबा सुलेमान पाणंद रस्त्यावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून तुळजा कॉम्प्लेक्सचे सांडपाणी वाहत आहे. हे सांडपाणी आता अबुबक्कर हसन शेख यांच्या मालकीच्या विहिरीत शिरू लागले आहे. याच विहिरीचे पाणी परिसरातील अनेक नागरिक पिण्यासाठी वापरतात. सांडपाणी थेट विहिरीत जात असल्याने पाणी पूर्णपणे दूषित झाले असून, यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन आपला संताप व्यक्त केला आहे.
रहिवाशांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीही नगरपालिकेकडे अनेकवेळा तक्रारी आणि अर्ज करण्यात आले होते, मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. आता हा प्रश्न गंभीर बनला. येत्या तीन दिवसांत सांडपाण्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास, सर्व रहिवासी मिळून प्रशासनाविरुद्ध न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास काही अपाय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही श्री शेख यांनी म्हटले आहे. यावेळी उस्मान शेख, जैनबबी शेख, समद शेख, याकूब शेख वासिम खान, आफताब खान, अश्रफ खान, इस्माईल शेख, हवाबी शेख आधी नागरिक उपस्थित होते.










