उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात २७ जुलै पासून "सेवा सप्ताह"

Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2023 17:11 PM
views 163  views

वेंगुर्ले :  माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने २७ जुलै पासून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी वेंगुर्ले तालुका पक्षाच्या कार्यालयात दिली.

२७ जुलै रोजी साई मंदिर वेंगुर्ले येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून सकाळी ९ वा. महालघुरुद्र व महाप्रसाद, दुपारी ३ वा. म्हापण जि. प. मतदारसंघामध्ये परुळेबाजार येथे कार्यकर्ता संवाद मेळावा व गरजू  शेतकऱ्यांना खत वाटप, २८ जुलै रोजी तुळस जि. प. मतदारसंघात होडावडा सुभाषवाडी मराठे मंगल कार्यालय येथे सकाळी १०.३० वाजता कार्यकर्त्यांची संवाद मेळावा व खत वाटप तसेच तुळस येथील सिद्धेश परब याला पुराच्या पाण्यातून वाचवणाऱ्या मातोंड येथील ग्रामस्थांचा सन्मान व वजराट शाळा नं.१ मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व  शिक्षक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

२९ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. रेडी जि. प. मतदारसंघात आरवली साळगावकर हॉल येथे कार्यकर्ता संवाद मेळावा व खत वाटप, ३० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उभादांडा जि.प. मतदारसंघात ग्रामपंचायत नवीन हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा व गरजू शेतकऱ्यांना खत वाटप तर दुपारी ३ वाजता आडेली जि. प. मतदारसंघात वेतोरे गोगटे मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा व खत वाटप करण्यात येणार आहे. यावेळी या सेवा सप्ताहास शिवसेना नेते अरुण दुधवडकर, युवासेना उपसचिव गितेश राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, युवासेना उपसचिव मंदार शिरसाट, वेंगुर्ला तालुका संपर्कप्रमुख भालचंद्र चिपकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिली.