
सावंतवाडी : रेशन धान्य दुकानांचा 'ऑनलाइन सर्व्हर' ऐन दिवाळीत गेले १५ दिवस कोलमडल्यानं रेशन धान्य धारकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. महिन्याचा शेवटचा दिवस असून देखील बहुतांश लाभार्थी सेवेपासून वंचित राहिलेत. पहाटेपासून रेशन दुकानावर रांगा लावून देखील धान्य न मिळाल्यानं त्यांचा संताप अनावर झाला होता. गोरगरीब जनतेसह वयोवृद्धांना याचा फटका बसला. याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं सर्वसामान्यांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाला धडक देत संबंधितांना जाब विचारला. प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत जनभावना पोहचवली. तर अन्न पुरवठा विभागाला याची तात्काळ दखल घेत धान्य वितरणाला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली.
सावंतवाडी तालुक्यातील रेशन दुकानावर १५ दिवस नेटवर्क प्रॉब्लेममुळे सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे ऑनलाईन रेशन धान्य वितरणास अडथळे येत आहे. ऐन दिवाळीत सर्वसामान्य ग्रामीण भागातील लाभार्थी या समस्येमुळे हैराण झालेत. वारंवार रेशन दुकानावर रांगा लावून देखील पदरी रेशन ऐवजी निराशा पडत आहे. यात महिना संपला तरी केवळ बहुतांश रेशन धारकांंना धान्य पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या महिन्याच रेशन त्या धारकांना मिळणार की नाही याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कल्पना दिली जात नव्हती. धान्य वितरण देखील केल जात नव्हत. त्यामुळे या उर्वरित लाभार्थ्यांच्या रेशनच काय ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार यांनी तहसीलदारांना केला. यावेळी ठाकरे गटाचे तालुका संघटक, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य शासनानं जाहीर केलेला आनंदाचा शिदा सुद्धा दिवाळी संपत आली तरी अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही. केवळ पन्नास टक्केच त्याचे वितरण झाले आहे. तो शिधा देखील दुःखाचा ठरला. याबाबतची नाराजी अनेक नागरिकांकडून आमच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे. तर या महिन्यातील रेशन धारकांंना धान्य पुरवठा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा होणाऱ्या जन आक्रोशास राज्य सरकार जबाबदार राहिल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी, महिना संपला तरीही धान्य पुरवठा केला जाईल यासाठी तशी मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागासह सरकारच ही याकडे लक्ष वेधल आहे. जनभावना मंत्र्यांपर्यंत पोहचवली आहे. तर जिल्हा पुरवठा विभागाकडे देखील याबाबतच्या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत अस प्र. तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका संघटक मायकल डिसोझा, आबा सावंत, एकनाथ नारोजी, राजू शेटकर, रमाकांत राऊळ,उल्हास सावंत, संदीप गवस, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.