
जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि बँकिंग, वित्त आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याने शुक्रवारच्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी पातळीवर विसावले. डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या समभाग खरेदीमुळे निर्देशांकांना अधिक बळ मिळाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४६६.९५ अंशांनी वधारून ६३,३८४.५८ या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकावर स्थिरावला.
दिवसभरात त्याने ६०२.७३ कमाई करत ६३,५२०.३६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी निर्देशांकाने ६३,२८४.१९ अंशांचा उच्चांक गाठला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १३७.९० अंशांची भर घातली आणि तो १८,८२६ अंशांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला.