
कणकवली : फोंडाघाट - हवेलीनगर येथील ज्येष्ठ शिक्षक वसंत शंकर रेवडेकर (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. फोंडाघाट पंचक्रोशीत “रेवडेकर गुरुजी” म्हणून ओळख असलेले वसंत हे कडक शिस्त, निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमासाठी परिचित होते. ते “काका” या नावानेही परिचित होते.
वयाच्या २५व्या वर्षापासून लोरे, हरकुळ, फोंडा या भागातील प्राथमिक शाळांमध्ये त्यांनी शिक्षणसेवा बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्या निधनानंतर फोंडाघाट बाजारपेठ काही काळ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या सहाय्यक शिक्षिका स्नेहा रेवडेकर आणि आरोस विद्यालयातील कर्मचारी निशा रेवडेकर यांचे ते सासरे तर वेंगुर्ला आगार कर्मचारी विजय रेवडेकर यांचे ते वडील होत.










