
खेड : शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय अंदाजे ६५) यांचे अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. चिरणी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने मंगळवारी दुपारी ते बुलेटवरून लोटेच्या दिशेने निघाले असता, चिरणी पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात आंब्रे यांना गंभीर दुखापत झाली. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रत्नागिरी व त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता, मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मोहन आंब्रे हे शिवसेनेतील जुन्या पिढीतील अत्यंत कार्यक्षम आणि कडव्या कार्यकर्त्यांपैकी एक मानले जात होते. तालुका प्रमुख, पंचायत समितीचे उपसभापती अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. चिरणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव होता.
त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलं आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आर्मीमधून निवृत्त भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.