ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रुग्णवाहिकेसाठी 51 हजारांची देणगी

सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला हातभार
Edited by: विनायक गांवस
Published on: March 11, 2026 16:41 PM
views 42  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई, प्राध्यापक सुभाष गोवेकर व संस्थेचे सचिव  प्रकाश राऊळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्याकडून रोख रक्कम 51 हजार 500 रुपये एवढी देणगी  देण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले  सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. याचा अनुभव आम्ही नेहमी घेतो अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांकडून संस्थेला गौरवण्यात आले. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही सामाजिक बांधिल प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिली. 

ज्येष्ठ नागरिक या संस्थेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिक तरुणांप्रमाणे सेवाभावी कार्य करत आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितलं. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ,उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सहसचिव श्रीमती विदुल पाटकर, सल्लागार अण्णा देसाई  सदस्या मेघना राऊळ व इतर सदस्य सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, नाथा कदम तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे उपस्थित होते.