
सावंतवाडी : तळवणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानकडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन वारशाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या जान्हवी बर्डे, मुख्याध्यापक युवराज गोसावी, विनोद झेंडे, प्रमोद बिरोडकर, शाळेचे शिक्षक बापुशेठ कोरगांवकर, मनिषा राऊळ, शिवाजी कवडे तसेचं विद्यार्थ्यांचे पालक गोपाळ गावडे, किशोर पेडणेकर, पुर्वा मेस्त्री, नितिन गावडे, सुप्रिया मेस्त्री, दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान चे सदस्य तथा इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे, आबा चिपकर व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये मराठा शस्त्रागारातील मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंडा तलवार, नागीन तलवार, ढाल, जिरेटोप, तोफेची प्रतिकृती तसेच शिवकालीन ऐतिहासिक संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
यावेळी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन वस्तूंची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. अफजलखान वधावेळी वापरण्यात आलेल्या वाघनखांची माहिती सांगताना त्यांनी तो ऐतिहासिक प्रसंग जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेचं विविध दुर्गांची माहिती देत शिक्षणात्मक सत्रही घेण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्रे हाताळून त्यांची माहिती व अनुभव घेतला.











