भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते राजू गावडे यांचे निधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 05, 2023 21:36 PM
views 385  views

सावंतवाडी : चौकुळ येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते     राजेश दिगंबर तथा राजू गावडे (५१, रा. चौकूळ जुवाडवाडी, सध्या. रा. गोवा) यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या राजू गावडे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

राजू गावडे हे मागील १२ वर्षांपासून आजारी होते. तरीही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असायचे. राजू गावडे यांनी आंबोली-चौकुळ येथून आपल्या सामाजकारणाची सुरूवात केली. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक पदावर काम केले. माजी खासदार मेजर सुधीर सावंत यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात. सैनिक नागरी पतसंस्थेमध्ये वसुली अधिकारी म्हणून काही काळ ते कार्यरत होते.

त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपच्या माध्यमातूनही ते सतत लोकांशी जोडले गेले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी ते मोठ्या आजारपणाला सामोरे गेले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. अलीकडे त्यांची प्रकृती अस्थिर होती. त्यातच उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे गोवा येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, बहीण, भावोजी असा परिवार आहे.

दरम्यान, त्यांच्या निधनाची माहिती मिळताच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, चौकुळ सरपंच सुरेश शेटवे, गुलाबराव गावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर चौकुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.