कणकवली महाविद्यालयात 'उद्योजक आपल्या भेटीला' अंतर्गत चर्चासत्र

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 05, 2026 12:41 PM
views 33  views

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे  अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग  आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने आयोजित 'फळ प्रक्रिया उद्योगातील व्यवसायाच्या संधी' यावर ' उद्योजक आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी विचारमंचावर प्राचार्य युवराज महालिंगे, चंद्रराज उद्योग समूहाचे मालक दिनेश नारकर, हर्ष उद्योग समूहाचे हर्षल हिंदळेकर ( फळप्रक्रिया उद्योजक ), डॉ.राजेंद्र मुंबरकर, डॉ. शामराव डिसले व विभाग प्रमुख प्रा.मंदार पडेलकर उपस्थित होते.

उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे यशस्वी उद्योजकांच्या अनुभवातून शिक्षण घेणे. त्यांच्या प्रवासातील आव्हाने, यश आणि अपयश जाणून घेणे व विद्यार्थ्यांच्या मध्ये उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. त्याचबरोबर आपल्या भागात कशाप्रकारे व्यवसाय सुरू करता येईल याविषयीचे मार्गदर्शन मिळावे हा सुद्धा होता. यासाठी कणकवली महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या 'चंद्रराज' उद्योग समूहाचे श्री. दिनेश नारकर व 'हर्ष' उद्योग समूहाचे हर्षल हिंदळेकर यांना निमंत्रित केले होते. 

यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि समर्पण भावना ठेवावी, असे मत व्यक्त करून तरूण विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे मत व्यक्त केले. दिनेश नारकर यांनी आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत  यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे.  तसेच आजच्या तरुण मुलांनी वेळेचा सदुपयोग छोटा -मोठा व्यवसाय करण्यासाठी करावा, असे मत व्यक्त केले.  तर हर्षल हिंदळेकर यांनी आपल्या कोकण भागात सहजरीत्या मिळणाऱ्या फळावरती योग्य ती प्रक्रिया करून त्याच्यापासून  वेगवेगळे पदार्थ कशाप्रकारे तयार करता येतील यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नवीन कल्पना, जिद्द आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तरच व्यवसायामध्ये मोठे यश मिळते असे सांगितले.

सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थिनी स्नेहा असगेकर तर आभारप्रदर्शन रिंकी दळवी हिने केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.