
वेंगुर्ले : वेंगुर्ले ते सावंतवाडी रस्त्यामधील तुळस घाट परिसरात गोवर्धन मंदिर, तुळस घाट शेजारील मोरी गेल्या दोन वर्षांपासून नादुरूस्त अवस्थेत आहे. सदर ठिकाण हे अतिशय धोकादायक वळणावर असून गेल्या महिन्याभरात येथे २ ते ३ वेळा अपघात होताहोता टळले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन, रस्त्यावरील सदर मोरीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य सुजाता पडवळ यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी येथील पूजा इंगवळे यांच्याकडे केली आहे.
वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. असंख्य वाहनांची ये-जा या मार्गावरून होते. गेल्या दोन वर्षापासून याच मार्गावरील तुळस घाटीत गोवर्धन मंदिर वळणानजीकच्या मोरीचा भाग जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खचला आहे. तेथील भागाची सतत झीज सुरू असून वळणावरच असलेल्या या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना सतत आपला जीव मुठीत घेऊनच तेथून वाहने हाकावी लागतात. काहीवेळा अपघात होण्याचे प्रसंग या ठिकाणी घडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खचलेल्या भागाला अतिशय कमकुवत असे कुंपन करून धोक्याची सूचना चिन्हांकित केली आहे. सध्या या मार्गाने वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली असून निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची तात्काळ नोंद घेऊन हा भाग सुरक्षित व वाहतुकीयोग्य बनवावा, अशी मागणी सुजाता पडवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या पूजा इंगवळे यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिले आहे.










