
कणकवली : नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१२ मध्ये प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रांजली प्रदीप आरोलकर यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनप्रसंगी प्रदीप उर्फ भाऊ आरोलकर, उमेश आरोलकर तसेच तेलीआळी येथील नागरिक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रभाग क्र.१२ हा कणकवली शहराच्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती व महत्त्वाचा भाग असून येथे अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. तेली आळीतील मातीत भरलेली गटारे साफ करणे व आवश्यक ठिकाणी दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करणे, हर्णे आळीतील भूमिगत गटारांच्या चेंबरवरील झाकणे नव्याने बसविणे, तसेच नंदू आरोलकर ते उत्तम वालावलकर यांच्या घरामागील नगरपंचायतीच्या जागेची मोजणी करून तेथे सार्वजनिक विहीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व तरुणांसाठी ओपन जिम उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
परकर गुरुजी ते अतुल काळसेकर यांच्या घरामागील पाणंद बांधणे, आरक्षण क्र. २३ (गार्डन) व २४ (प्ले ग्राउंड) विकसित करून युवकांसाठी मैदान उपलब्ध करून देणे, कस्टम ऑफिस ते सह्याद्री हॉटेल दरम्यानचा रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती करणे, तसेच प्रभागातील छोट्या ड्रेनेज लाईन सुस्थितीत आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हर्णे आळीतील श्री. मधु हर्णे यांच्या घरासमोरील ब्राम्हण स्थळाचे सुशोभीकरण, नियमित कचरा संकलनासाठी घंटागाडी व किमान दोन कायम कर्मचारी नेमणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शासकीय जागेत सार्वजनिक शौचालय व बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणीही निवेदनात नमूद आहे.
तसेच तेंडोलकर अॅण्ड कंपनीलगत गग्नेशनिलया कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व सार्वजनिक गटारांवर झाकणे बसविणे, तसेच पंचायत समिती कार्यालयामागील जुन्या जिल्हा परिषद शाळा क्र.४ च्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.










