
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी राज्यातील पंचवीस तंत्रनिकेतन संस्थाची 'इनक्युबेशन सेंटर' म्हणून निवड केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचा यामध्ये समावेश असून त्याबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थी व अध्यापकांमध्ये इनक्युबेशन, स्टार्ट-अप याबाबत जागरूकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देऊन तांत्रिक क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधणे, अध्यापक व विद्यार्थी यांना स्टार्ट-अप करिता उपलब्ध परिसंस्थेची ओळख करून देणे या उद्देशाने ही सेंटर्स कार्यान्वित होणार आहेत.
हा उपक्रम राबविण्यासाठी मंडळाने सीओईपी या संस्थेच्या भाऊ इन्स्टिटयूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रिन्युअरशिप अँड लीडरशिप, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. या करारात इनक्युबेशन संबंधीत जागरूकता निर्माण करणे, नवसंकल्पनांना वाव देणे, विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करणे, संशोधन, विकास आणि नेटवर्किंगच्या संधी प्रदान करणे अशा विविध बाबींचा समावेश आहे. निवड झालेल्या तंत्रनिकेतन संस्थांमधून 'हब अँड स्पोक मॉडेल' धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन तंत्रशिक्षण मंडळ आणि भाऊ इन्स्टिट्यूटच्या वतीने पुरविण्यात येईल.जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी या सेंटरचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास कॉलेजचे उपप्राचार्य व पॉलिटेक्निक इनचार्ज गजानन भोसले यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले आणि प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.