इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी पांडुरंग काकतकर यांची निवड

Edited by:
Published on: November 27, 2024 12:19 PM
views 210  views

सावंतवाडी : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकारद्वारा आयोजित  *इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (IISF 2024)* दि.30 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर या कालावधीत आयआयटी गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित करण्यात आला आहे. यामधील *सायन्स सफारी* या इव्हेंटसाठी देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे राज्य शासन पुरस्कारप्राप्त उपक्रमशील विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांची निवड झाली आहे. संपुर्ण देशभरातून विज्ञान विषयात इनोव्हेटिव्ह काम करणाऱ्या हजारो इच्छुकां मधून  निकषपात्र निवडक अनुभवी तज्ञांची निवड झालेली आहे त्यात महाराष्ट्रातून पाच तर कोंकण विभागातून एकमेव काकतकर यांची निवड झालेली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या इव्हेंटचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंग, आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमांता बिस्वा सर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यामध्ये जगभरातील चाळीसहून अधिक देशांतील शास्त्रज्ञ चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत.यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार व भविष्यातील आव्हाने यासंबधी मार्गदर्शन करणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी अध्यापनात "सायन्स थ्रू  टॉइज,गेम्स अँड एडवेंचर्स  आधारीत *सायन्स सफारी*  हा इव्हेंट आयोजित करण्यात आला असून त्यात  विज्ञान विषयातील वेगवेगळ्या संकल्पना वर आधारित "लो कॉस्ट मॉडेल्स इन सायन्स" या संदर्भात ते सादरीकरण करणार आहेत. सदर उपक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग आपल्या जिल्हयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. या निवडीबद्दल शिक्षण उपसंचालक  महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके,सोनुर्ली संस्थेचे अध्यक्ष दिंगबर मोर्ये,संस्थेचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती अध्यक्षा आनंदी गावकर,विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक अरुण तेरसे सहकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विज्ञानप्रेमी ग्रामस्थ यांचेकडून विशेष अभिनंदन होत आहे. या आंतरराष्ट्रीय इव्हेंटसाठी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राज्य शैक्षणिक संशोधन संस्था पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.सिंधुदुर्ग तसेच देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संस्थेचे त्यांनी आभार मानले आहेत.