
वेंगुर्ले : सागर किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेंगुर्लेत सी व्हिजन २०२२ अंतर्गत सागर सुरक्षा कवच मोहिम आज मंगळवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजल्यापासून राबविण्यात आली. रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टी पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तसेच मानसीश्वर मंदिर समोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट, मठ चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह अन्य ७ पोलिस अधिकारी, ३६ पोलीस अंमलदार, ३ होमगार्ड, १२ वॉर्डन, ५९ सागर रक्षक सदस्य, २२ एनसीसी कॅडेट, मेरिटाईम बोर्ड विभाग आदी सहभागी झाले होते. ही मोहीम उद्या बुधवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.