माणगावात गुरुवारपासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Edited by: भरत केसरकर
Published on: December 06, 2023 19:13 PM
views 108  views

कुडाळ : कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून सुरू होत असून ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे.

७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. वैज्ञानिक प्रतिकृती मांडणी, ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते, तर कुडाळ गटविकास अधिकारी तथा प्रशासक विशाल तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.तर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सगुण धुरी, संस्था उपाध्यक्ष बाळा जोशी,सचिव एकनाथ केसरकर, सीईओ वि.न. आकेरकर, संचालक चंद्रशेखर जोशी, महेश भिसे, दत्तदिगंबर धुरी, बाली नानचे,साईनाथ नार्वेकर,सरपंच सौ.मनीषा भोसले, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दुपारी १२.३० वाजता सायंकाळी ५ पर्यंत वक्तृत्व व निबंध स्पर्धा (सर्व गट), ८ रोजी सकाळी ९ पासून वैज्ञानिक व शैक्षणिक प्रतिकृती परीक्षण, १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक व माध्यमिक गट), ९ रोजी सकाळी ११ वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली, तर माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एकनाथ केसरकर, या मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयप्रकाश आकेरकर व संचालकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला कुडाळ तालुक्यातील विविध माध्यमिक व प्राथमिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. हे विज्ञान प्रदर्शन म्हणजे मुलांना एक पर्वणी ठरणार आहे. सध्या सरकार लघु उद्योजकांना छोट्या छोट्या  उद्योगांसाठी प्रोत्साहित करत असताना या विज्ञान प्रदर्शनाला आता फार महत्त्व प्राप्त झाले आहे.


शनिवारी ९ डिसेंबरला बक्षीस वितरण

          शनिवारी ९ डिसेंबरला विज्ञान प्रदर्शनाची सांगता होणार आहे.यादिवशी बक्षीस वितरण होणार आहे.ज्या ज्या शाळा,विद्यार्थी, शिक्षकांनी विशेष प्राविण्य संपादन केले आहे.त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.या बक्षीस वितरणानंतर विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.


माणगाव हायस्कूलची जय्यत तयारी : प्रशांत धोंड

      या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी माणगाव हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व सर्व कर्मचारी जय्यत तयारी करत आहेत. स्टेजव्यवस्था, प्रदर्शन मांडणी कक्ष, भोजन व्यवस्था, स्वागत कक्ष असे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय मॉडेल्स मांडणीसाठी ही स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. शाळा परिसर सजवण्यात आले असून रंगरंगोटी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.या यजमान पदासाठी आम्ही सज्ज असून आमची तयारी पूर्ण झाल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी म्हटले आहे.


    विशाल परब यांच्याकडून मोफत जेवण्याची व्यवस्था

    भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे युवा उपाध्यक्ष,युवा उद्योजक तथा माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी विशाल परब यांच्याकडून मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.या प्रदर्शनासाठी दोन दिवस लागणाऱ्या भोजनाची मोफत व्यवस्था विशाल परब यांनी केली आहे.या प्रदर्शनासाठी जे येणारे शिक्षक, विद्यार्थी यांना मोफत जेवण  विशाल परब यांच्याकडून देण्यात येणार आहे.विशाल परब हे माणगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून या विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद माणगाव हायस्कूल मिळत असल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिक्रिया  विशाल परब यांनी दिली आहे.


    प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आणी मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले आहे.