
देवगड : देवगड तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या शाळांना दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंचच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
देवगड तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेली चार-पाच वर्ष दीक्षित फाउंडेशन मार्फत प्रयत्न केले जात आहेत. दीक्षित फाउंडेशन च्या वतीने निरंजन दीक्षित यांनी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या क्रीडांगण आणि शैक्षणिक उपयोगी साधनांचे वाटप केलेले आहे. यावर्षी शैक्षणिक विचार मंच स्थापन करून त्यामार्फत वर्षभर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यानुसार देवगड तालुक्यामधील जूनियर कॉलेजच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा कार्यक्रम जामसंडे हायस्कूलच्या नलावडे सभागृहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगडचे माजी आमदार आणि विद्या विकास मंडळ जामसंडेचे अध्यक्ष अजित गोगटे होते.कार्यक्रमाला दीक्षित फाउंडेशन चे सर्वेसर्वा निरंजन दीक्षित शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष नारायण माने, समन्वयक हिराचंद तानवडे, सचिव माधव यादव, व मंचचे सदस्य सुरेश देवळेकर,इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तानवडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. त्यांनी दीक्षित फाउंडेशनच्या वर्षभराच्या कार्यक्रमाची माहिती दिली. आणि आजच्या कार्यक्रमाच्या हेतू कथन केला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते तालुक्यातील एकोणीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले 19 विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आले. सदरची शिष्यवृत्ती अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. आणि त्यांचा वर्षाचा शैक्षणिक दर्जा पाहून सदर विद्यार्थ्यांना पुढील वर्षी सुद्धा तीन हजार रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाईल पण यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे असे फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.शिष्यवृत्ती वाटपानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांनी फाउंडेशन नेहमी कौतुक करते मदत करते याबद्दल ऋण व्यक्त करून निरंजन दीक्षित यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी निरंजन दीक्षित यांनी आतापर्यंत केलेल्या कामाला उजाळा दिला आणि समाजामध्ये अशा व्यक्तींची आज नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले. यावेळी देवगड तालुक्यातून दूरवरून आलेल्या मुलांना प्रवास खर्च देण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थी व पालक यांना अल्पोपहार दिला गेला.
सदरच्या कार्यक्रमासाठी देवगड तालुक्यातील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी सहकार्य केले. व कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोगटे मुख्याध्यापक जमसंडे हायस्कूल तर आभार माधव यादव मुख्याध्यापक कुणकेश्वर हायस्कूल यांनी मानले.