सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना 'अच्छे दिन' !

▪️ 'मेड इन इंडिया'तून चिनी खेळण्यांना सक्षम पर्याय !
Edited by:
Published on: February 02, 2025 16:19 PM
views 582  views

सावंतवाडी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशात खेळणी उत्पादनांवर भर देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे.  यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांना सक्षम पर्याय मिळणार आहे. लाकडी खेळणी, फळे सावंतवाडीचे मानबिंदू असून या व्यवसायाला 'मेड इन इंडिया'मुळे ऊर्जितावस्था मिळणार आहे. खऱ्या अर्थानं सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना 'अच्छे दिन' येणार आहेत.

युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने अनेक घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या. त्यातील महत्त्वाच्या घोषणांपैकी एक देशात आता 'मेड इन इंडिया' खेळणी मिळणार आहेत ही होती. खेळण्यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय योजना आणण्यात येणार आहे. 'स्टार्ट अप'साठी दहा हजार कोटींचे फंड उभारण्याची घोषणा केली आहे. खेळणी उत्पादन क्षेत्रासाठी भारत 'ग्लोबल हब' बनवण्यात येणार असून ही खेळणी 'मेक इन इंडिया'च्या नावानं विकली जाणार आहेत. तसेच खेळणी उद्योगासाठी एक योजना कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनेंतर्गत 'क्लस्टर रुम', 'पॉश लूम' निर्माण करून 'इको सिस्टीम'वर अधिक भर देण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या या तरतुदी नंतर सावंतवाडीतील लाकडी खेळणी तयार करणारा उद्योजक, कारागीर वर्ग आनंदी झाला आहे. या निर्णयामुळे चांगले दिवस लाकडी खेळण्यांना येणार असून 'सावंतवाडी पॅटर्न' चिनी खेळण्यांना सक्षम पर्याय ठरणार आहे. सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांचे व्यापारी, कलावंत, मोठ्या उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या लाकडी खेळण्यांसाठी सावंतवाडीच्या राजघराण्याचं योगदान फार मोठं आहे. येथील कलाकारांना प्रोत्साहन देऊन राजाश्रय देण्याचं काम राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी केलं होतं. स्वतः कला  आत्मसात केली होती. सावंतवाडीतील लाखकामाचे पुनरूज्जिवन त्यांनी केलं होत. लॅकरवेअर्सकरिता त्यांना पारितोषिक मिळाली होती. यासाठी देश-विदेशातही कौतुक झालं होतं. राजेसाहेबांच्या पश्चात राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी हा वारसा सांभाळा होता. राजेसाहेब अध्यक्ष असलेल्या सावंतवाडी लॅकरवेअर्स या संस्थेच्या माध्यमातून या कलेला  उर्जितावस्थेस आणण्याचे त्यांचे योगदान मोठं होतं. कलेला चालना देवून कलाकारांना अर्थाजनाचे साधन प्राप्त करून दिले होते. हा वारसा आता राणीसाहेब शुभदादेवी भोसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले पुढे घेऊन जात आहेत. 

केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीसाठी राणीसाहेब शुभदादेवी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. सावंतवाडीची ओळख यामुळे जगभरात पोहचणार आहे. याच श्रेय राजेसाहेब शिवरामराजे व राजमाता सत्वशीलादेवी यांना आहे. या कलेला अन् कलावंतांना अर्थसंकल्पात प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारलाही धन्यवाद देते अशा भावना राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी व्यक्त केल्या. तसेच  युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, सावंतवाडीची ओळख लाकडी खेळणी आहे. जीआय मानांकन आम्हाला मिळाल आहे. देशात महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे जे गंजिफा तयार करत. गंजिफा साडीही तयार होत आहे. 'मेक इन इंडिया' हे सरकारच धोरण कलावंतांना , उद्योजकांना प्रोत्साहन देणार आहे. यामुळे देश-विदेशात आपली कला निश्चित पोहचेल असा विश्वास युवराज्ञींनी व्यक्त केला.

एकंदरीत, केंद्रीय अर्थसंकल्पात खेळणी उत्पादनांवर भर देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केल्यानं निश्चितच नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. सावंतवाडीतील विविधांगी लाकडी खेळणी, लाकडी वस्तूंना यामुळे मोठं पाठबळ मिळालं आहे. चिनी खेळण्यांना हा सक्षम पर्याय असल्यानं खऱ्या अर्थानं सावंतवाडीच्या कलेला आता ऊर्जितावस्था मिळणार आहे.