आठवणीतल्या खेळात रमले सावंतवाडीकर..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 17:48 PM
views 393  views

सावंतवाडी : अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग' या सामाजिक संस्थेने यंदा सावंतवाडी शहरात प्रथमच माझा वेंगुर्ला संचलित 'खेळ आठवणीतील' या उपक्रमाद्वारे लुप्त झालेल्या खेळांच आयोजन करण्यात आल. याचा शुभारंभ डॉ.प्रसाद देवधर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. सावंतवाडीवासियांसाठी ही खास पर्वणी ठरली. या खेळात सावंतवाडीकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

मोबाईलच्या काळात गेल्या २०-२५ वर्षात लुप्त झालेल्या क्रिडा प्रकारांना नव्या पिढीला अवगत करण्यासाठी व हे खेळ जे लोक खेळले आहेत अशा सर्व नागरिकांसाठी त्यांच्या बालपणातील रम्य आठवणी जागवण्यासाठी 'अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग' या सामाजिक संस्थेने यंदा सावंतवाडी शहरात प्रथमच माझा वेंगुर्ला संचलित 'खेळ आठवणीतील' या उपक्रमाद्वारे लुप्त झालेल्या विटी दांडु, हुतुतु, टायर फिरवणे, पकडा पकडी, तळ्यात मळ्यात, सागर गोट्या, लंगडी, आईचा रुमाल असे जवळपास २० हून अधिक क्रिडा प्रकार खेळण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिली. याचा शुभारंभ शनिवारी झाला.  आबालवृद्धांनी यात सहभागी होत खेळांचा आनंद लुटला. ऐतिहासिक गंजिफा हा खेळ खास आकर्षण ठरला. याप्रसंगी डॉ. प्रसाद देवधर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कपिल पोकळे, अण्णा म्हापसेकर,डॉ. प्रसाद नार्वेकर, अँड. अनिल निरवडेकर, ओंकार तुळसुलकर, किशोर चिटणीस, अमेय पै, भावेश भिसे, राजू केळूसकर, जितू मोरजकर, अमित आरवारी, प्रदीप सावरवाडकर, बाळू वालावलकर, दीपक गांवकर, महेंद्र गावडे, मंदार केरकर, संतोष वैज, विनोद वालावलकर, खेमराज कुबल आदी उपस्थित होते.