LIVE UPDATES

शहीद रामसिंग मेमोरियल हायस्कूल, तोरसे येथे 'ज्ञानगौरव' सोहळा संपन्न

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 12, 2026 19:58 PM
views 25  views

पेडणे : पन्नास वर्षांपूर्वी सरकारी हायस्कूल, तोरसे येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले निवृत्त शिक्षक मनोहर पेंडसे हे आपल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळेसाठी भरीव कार्य करण्याची प्रेरणा देतात. आर्थिक सहाय्य करून शाळेला खुर्च्या प्रदान करणे, वृक्षरोपण करणे आणि विद्यार्थ्यांचा गौरव करणे असे अनेक उपक्रम ते राबवून घेतात. शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या कु. पूनम प्रभाकर गावडे, प्रांजल भगवान नाईक आणि प्रांजल चंद्रशेखर परब या तीन विद्यार्थ्यांचा आजचा 'ज्ञानगौरव' सोहळा हा त्याचाच एक भाग आहे," असे उद्गार प्रमुख वक्ते आणि शाळेचे माजी विद्यार्थी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त संचालक श्री. सुरेश रामकृष्ण उगवेकर यांनी काढले.

शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मधुकर नाईक यांनीही आपल्या भाषणातून, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन भविष्यात उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे, असे सांगत कौतुकाचे उद्गार काढले. शहीद रामसिंग मेमोरियल सरकारी विद्यालय, तोरसे आणि मनोहर पेंडसे ग्रुप, पेडणे (माजी विद्यार्थी संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शालांत परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून माजी विद्यार्थी सुरेश उगवेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक व प्रसिद्ध नाट्यलेखक नरेंद्र मधुकर नाईक, धोंडू परब, मधुकर गवंडी, नवनाथ तोरस्कर आणि दशरथ परब उपस्थित होते.

सर्व पारितोषिके मनोहर रामचंद्र पेंडसे (पुणे) यांनी पुरस्कृत केली होती. त्यांचे संदेशपर भाषणही या वेळी विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाची संकल्पना एकनाथ महाले यांची होती. त्यांनी केलेल्या नियोजनानुसार ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या प्रसंगी अमर आसोलकर, आनंद नाईक, एकनाथ महाले, श्यामसुंदर आसोलकर, मनोहर उगवेकर, श्रीकांत परब यांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनेh उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईल कलंगुटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुषमा गोसावी मोरजकर  यांनी केले.