
देवगड : भाजपा देवगड-जामसंडे शहरच्यावतीने नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांबाबत मा. मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रलंबित कामे, पाणीपुरवठा समस्या तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध प्रश्नांवर यावेळी सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीत नगरपंचायत क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. अर्धवट स्थितीत असलेल्या कामांबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच पाणीपुरवठा दुरुस्ती कामांची सद्यस्थिती जाणून घेत नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
स्वच्छता समिती अंतर्गत येणाऱ्या सांडपाण्याच्या समस्यांबाबतही नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची माहिती घेण्यात आली. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी योग्य नियोजन करून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे, भाजपा नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, बुवा तारी, रोहन खेडेकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, शहराध्यक्षा तन्वी शिंदे, भाजपा उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष धुरी, बाळा गावकर, माजी नगरसेवक उमेश कणेरकर, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, शिवाजी कांदळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










