
बांदा : २००४ मध्ये मी निवृत्त झालो, त्यानंतर कशी वर्षे गेली समजलचं नाही. मधल्या काळात हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होतो. नंतर सावंतवाडीत वास्तव्य केलंय. तिथच आम्ही दोघेजण राहतो शेवटच्या प्रवासाची वाट बघत, कारण आमची मुलं सगळी बाहेर गेलीत. माझ्या आयुष्याच्या वाळवंटामध्ये कुठेतरी ओयासिस शोधतोय. आयुष्य हे निरस व्हायला लागलं. तरीसुद्धा कुठेतरी आनंद शोधायचा प्रयत्न मी करतोय. भूतकाळात मी कधीकधी रमून जातो. अर्ध आयुष्य मी कोलझर आणि मडूरा हायस्कूलमध्ये शिकवण्यात घालवलं. भूतकाळातील काही स्थळं आनंदाला उभारी देतात. हेडमास्तर हा पाॅलिसीमेकर असतो. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न मी केला, असे उद्गार मडूरा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक वाय. जे. देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. न्यू इंग्लिश स्कूल मडुरा शाळेच्या सन २०००-२००१ मधील दहावी बॅचच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
सावंतवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मडुरा शाळेच्या सन २०००-२००१ मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा स्नेहमेळावा रविवारी १७ मार्चला मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील जुने दिवस पुन्हा यावे याकरिता माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरला. यावेळी शाळेतील जुने दिवस आठवत या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. या मेळाव्याच्या सुरवातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या सर्वांना माजी विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. प्रत्येकाने आपल्या आठवणी कथन केल्या. यावेळी उपस्थित माजी शिक्षकांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. शाळा सोडून अनेक वर्षांनंतर मित्र मैत्रिणींच्या झालेल्या गाठीभेटींमुळे सारेच भारावून गेले. शाळेत केलेल्या खोड्या, शिक्षकांचा मिळेला ओरडा या आठवणींत विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.
या कार्यक्रमासाठी निवृत्त मुख्याध्यापक वाय. जे. देसाई, जी. के. गावडे, कोरगावकर सर, पावसकर, ए. व्ही पाटील, चंद्रशेखर नाडकर्णी, सांगेलकर, शिरोडकर, देसाई मॅडम, बी. व्ही. देसाई, कांबळे मॅडम, सुनंदा देसाई मॅडम , राणे मॅडम, चव्हाण मॅडम, एस. आय. देसाई मॅडम, बी. बी. देसाई मॅडम अडी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भिवा सदू शेगडे, आरती करमळकर, नय\ना कोरगावकर, दिपक राऊळ, विशाल सातार्डेकर, गोविंदा नाईक, रुपेश राणे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती करमळकर तर आभार जयवंत धुरी यांनी मानले.










