
सावंतवाडी : शहरात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. धारगळ-गोवा येथील प्रसिद्ध 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद'ची (AIIA) एक शाखा सावंतवाडीत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.
यावेळी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, शर्वरी धारगळकर, अजय गोंदावळे आदींसह पालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पूर्वतयारीसाठी गोवा येथील आयुर्वेद संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आज सावंतवाडीत येऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये डॉ. पी. के. प्रजापती, प्रोफेसर डॉ. सुजाता कदम आणि डॉ. भार्गव भिडे यांचा समावेश होता. या टीमने नगरपालिकेच्या जागेची तांत्रिक पाहणी करून माहिती घेतली. धारगळ येथील मुख्य रुग्णालयाप्रमाणेच ही शाखा सावंतवाडीत कार्यान्वित व्हावी, यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष पुढाकार घेतला असून प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या जागेत हे रुग्णालय सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना दर्जेदार आयुर्वेदिक उपचार घरबसल्या उपलब्ध होतील. ही शाखा लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी खुली व्हावी या उद्देशाने बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या नव्या आरोग्य सुविधेमुळे सावंतवाडीच्या आरोग्य व्यवस्थेत मोठी भर पडणार आहे.










