स्थानिक नगरसेवकांना डावलून भुमिपूजन केल्यास जशास तसे उत्तर देऊ !

शर्वरी धारगळकर यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 20:17 PM
views 108  views

सावंतवाडी : शहरातील आमच्या  प्रभागामधील गटार बांधून बंदीस्त करण्यासह शहरातील विविध भुमिपूजन कामाच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक व प्रशासन यांच्याकडून स्थानिक नगरसेवक व नगरसेविका यांना डावलण्यात आले. या अगोदर केलेल्या सर्व कामांची भुमिपूजन करुन १ महिना लोटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. स्थानिक नगरसेवकांना डावलून भुमिपूजन केल्यास शिवसेनाकडून जशास तस उत्तर देऊ, असा इशारा नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी दिला आहे‌.

भुमिपूजन करुन १ महिना लोटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. नगराध्यक्षा फक्त व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करत विकासकामे करुन घेतल्याचे भासवत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत त्यांना काहीच पडलेले नाही आहे. पावसाळ्याअगोदर गटार बांधून घेणे गरजेचे असताना देखील आजतागायत कामांस सुरुवात झालेली नाही. त्यात बरीच कामे ही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत. ही कामे मंजूर होण्यासाठी सातत्याने शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे जर स्थानिक नगरसेवकांना डावलून भुमिपूजन केल्यास शिवसेना पक्षाकडून जशास तसे उत्तर देऊ असा इशारा नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी देत सत्ताधारी व प्रशासनावर सडकून टीका केली आहे‌.