
देवगड : 'आपले सरकार' पोर्टल बंद असल्यामुळे दाखले मिळण्यास विलंब व प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्या साठी मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांच्याकडून देवगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संतोष मयेकर (तालुका अध्यक्ष),पप्पू जाधव (मनविसे तालुका अध्यक्ष),ममता मंदार धुरत (महिला शहर अध्यक्ष्या) अभिजित तेली(मनविसे शहर अध्यक्ष),आदी उपस्थित होते.
मनसे ने या निवेदनात असे म्हटले आहे की.मागील काही दिवसांपासून 'आपले सरकार' हे शासकीय वेब पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे पूर्णपणे बंद आहे. या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले (उदा. उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र) मिळालेले नाहीत.महा-ई-सेवा केंद्रात वारंवार चकरा मारूनही पोर्टल चालत नसल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या शाळा आणि महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी हे दाखले सादर करणे अनिवार्य आहे. दाखल्यांशिवाय महाविद्यालये प्रवेश अर्ज स्वीकारत नाहीत. पोर्टल बंद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आपले सरकार पोर्टलवरील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत. दाखले मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना तात्पुरत्या पावतीवर (Registration Receipt) प्रवेश देण्याबाबत शैक्षणिक संस्थांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला काही दिवसांची मुदतवाढ मिळण्यासाठी मदत करावी. तरी आपण या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन मनसे कडून देण्यात आले आहे.










