सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर नगराध्यक्षा ॲक्शन मोडवर

प्रशासनाने उचलली कठोर पावलं
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 20:03 PM
views 178  views

सावंतवाडी : शहरातील द्वारकामाई इमारत परिसरात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर आज नगराध्यक्षांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या परिसरातील सांडपाणी थेट बोरवेलमध्ये जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत, प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

द्वारकामाई इमारत परिसरात श्री. बांदेकर यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्याने सांडपाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे दूषित पाणी येथील बोरवेलमध्ये झीरपत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना कडक सूचना दिल्यात. सांडपाणी साचलेल्या ठिकाणी तत्काळ सक्षन मशीन लावून गटार पूर्णपणे साफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांची तातडीने बैठक घेऊन त्यांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात येणार आहेत. ज्या सोसायट्यांकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच, येत्या १५ दिवसांत सावंतवाडीतील अशा सर्व सोसायट्यांचा सर्व्हे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, बांदेकर यांच्या घराजवळून जाणाऱ्या गटारासंदर्भात त्यांनी केलेल्या मागणी नुसार बांधकाम विभागाने त्या जागेची  पाहणी करावी जेणेकरून यावर कायमस्वरूपी आणि योग्य तो निर्णय घेता येईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सांडपाणी प्रश्नावर आता नगरपरिषद प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आले असून येत्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले,  दुलारी रांगणेकर, द्वारकामाई बिल्डिंगचे रहिवासी, नगरपालिका अधिकारी आदी उपस्थित होते.