
दोडामार्ग : यंदाच्या दहावीच्या परिक्षेत दोडामार्ग तालुक्यात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील रहिवाशी व तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त चिन्मयी जयसिंग खानोलकर (९८.६०%) व तृतीय क्रमांक प्राप्त चैतन्य मंदार फातर्फेकर (९५.६०%) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग येथील विद्यार्थिनी चिन्मयी जयसिंग खानोलकर हिने ९८.६० टक्के गुण मिळवत दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी येथील विद्यार्थी चैतन्य मंदार फातपेंकर याने शाळेत प्रथम क्रमांक मिळविण्याबरोबरच दोडामार्ग तालुक्यात तृतीय क्रमांक संपादन केला. विशेष म्हणजे गणित विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत त्याने वेगळी छाप पाडली.
या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी गौरव केला. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस उपस्थित होते. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामुळे दोडामार्ग तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.










