सावंतवाडीत १७ मे रोजी भव्य 'सकल हिंदू संमेलन'

Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 11:56 AM
views 164  views

सावंतवाडी : भारतीय संस्कृती, सनातन धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने सावंतवाडीत येत्या रविवार १७ मे २०२६ रोजी भव्य 'सकल हिंदू संमेलना' चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४:०० वाजता हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती हिंदू संमेलन समन्वयक समिती सावंतवाडीचे संयोजक सुहास सातोस्कर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या संमेलनासाठी वारकरी संप्रदायाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री. विश्वनाथ गवंडळकर महाराज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे (अध्यक्ष, हिंदवी परिवार), ज्ञान प्रबोधनीचे मुख्य समन्वयक अमित नाईक आणि युवा कीर्तनकार ह.भ.प. सायलीताई गावडे महाराज हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत साकारलेले भव्य राम मंदिर हे हिंदू अस्मितेचे प्रतीक ठरले आहे. मात्र, सध्या धर्म आणि संस्कृतीसमोर असलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व भेदभाव विसरून संघटित होणे ही काळाची गरज आहे. याच 'हिंदू एकता' आणि 'जागृती'चा संदेश देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री. सातोस्कर यांनी दिली.

या सोहळ्याचे नियोजन हिंदू संमेलन समन्वय समिती, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संयोजक सुहास दत्तात्रय सातोस्कर, सहसंयोजक शांबा (अण्णा) म्हापसेकर, चंद्रशेखर पारधी, सौ. अपूर्वा माईणकर, सौ. अंजली नातू, चिन्मय रानडे, आनंद साधले असून "हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया" हा संकल्प घेऊन होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व माता, भगिनी आणि बांधवांनी मित्रपरिवारासह पारंपारिक मंगल वेषात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संयोजक सुहास सातोस्कर, अण्णा म्हापसेकर, अंजली नातू, किशोर नानिवडेकर, दिनेश गावडे, रोहन बांदेकर आदी उपस्थित होते.