
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा आयोजित सावंतवाडी येथील ज्येष्ठ कवयित्री, कादंबरीकार, नाटककार प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज रविवार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वा. मुंबई येथे केशवराव घैसास ऑडिटोरियम, विलेपार्ले, पू. मुंबई येथे होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सदस्य उषा परब यांच्या या पुस्तकांमध्ये 'स्त्रियांची ओवीगीतं - साज आणि स्वरूप' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने तर 'निसरड' हा कथासंग्रह डिंपल प्रकाशन, मुंबईने प्रकाशित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष तथा साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, कोमसाप केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर तसेच ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, लेखक व समीक्षक डॉ. अजित मगदूम, अनुप कर्णिक, रेखा नार्वेकर, एल. बी. पाटील, दीपा ठाणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.










