
सावंतवाडी : शहरात सध्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर सुरू असताना, शहराचा डोलारा सांभाळण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत चालल्या आहेत.सद्या कार्यरत असलेले प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे ओरोस, कुडाळ, सावंतवाडी या तीन ठिकाण चा पदभार असल्याने शहरातील समस्यांवर दुर्लक्ष होउन नागरिकांचे नुकसान होत आहे. सावंतवाडी नगरपालिकेला तात्काळ पूर्णवेळ कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पालिकेला एकही कायमस्वरूपी अधिकारी मिळालेला नाही. जे अधिकारी आले, त्यांचा कार्यकाळ अत्यंत अल्प राहिला. सध्या शहरात महत्त्वाची विकासकामे सुरू आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणारा आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणारा सक्षम अधिकारी नसल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. मुख्याधिकाऱ्यांअभावी नागरिकांच्या अनेक तक्रारी धूळ खात पडून आहेत. नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जात आहेत. मात्र, प्रशासकीय समन्वयाअभावी लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे. शहरातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक हैराण आहेत. तक्रार करायला गेल्यास ठोस उत्तर मिळत नाही. प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे ही काळाची गरज आहे अशी मागणी श्री. सूर्याजी यांनी केली आहे. तसेच याची प्रत नगरपालिका आयुक्त व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांना पाठविण्यात आली आहे










