कंटेनरच्या प्रवासात क्लिनरचा मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 25, 2026 18:54 PM
views 126  views

कणकवली : कंटेनर प्रवासात अस्वस्थ वाटल्याने संपर्क साधल्यानुसार १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता कंटेनरचा क्लीनर अजिज शिसपाल (५१, रा. राजस्थान ) याचा मृत्यू झाला होता. ही घटना महामार्गावरील साळीस्ते येथे शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची खबर कंटेनरचा चालक नरेंद्र राजेंद्र सिंह (३६,  रा. राजस्थान) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार नरेंद्र व मयत अजिज हे मालवाहू कंटेनर घेऊन मुंबईतून गोव्याच्या दिशेने निघाले होते. वाटेत अजिज यांना अचानक घाम येऊन अशक्तपणा जाणवू लागला. त्यांचे डोकेही दुखू लागले. परिणामी नरेंद्र यांनी साळीस्ते येथे कंटेनर उभा केला व १०८ रुग्णवाहीकेशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता अजिज यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिलिंद देसाई करीत आहेत.