
कणकवली : कणकवली फोंडाघाट रस्तावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने अवजड वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता, तरी देखील काही अवजड वाहने या रस्त्याने ये जा करत आहेत. हा पर्यायी मार्ग अरुंद आणि चढउताराचा असल्याने मोठा अपघात घडू शकतो. काही दिवसांपूर्वी एक कंटेनर देखील रस्त्याच्या बाजूला कलेडला होता. त्यामुळे तातडीने हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद करावा अशी मागणी फोंडाघाट ग्रामस्थांची आहे. त्यामुळे पुढील अपघात होऊ नये यासाठी फोंडाघाट जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे व जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मुल्ला मॅडम यांची भेट घेऊन यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले.
याबाबत पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, त्या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. यावेळी जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, फोंडाघाट जि. प. सदस्य राजन चिके, संजय नकाशे जिल्हा चिरे वाहतूक संघटना, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड ठेकेदार ए. पी. सावंत, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर उपस्थित होते. पर्यायी रस्ता कणकवली तळेरे वैभववाडी गगनबावडा मार्गे कोल्हापूर असा वळवण्यात आला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे अवजड वाहनधारकांनी याची नोंद घेऊनच प्रवास करावा असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.










