
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांची उज्वल निकालाची परंपरा कायम आहे. अनेक कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र आपले विद्यार्थी कमी पडताना दिसतात. शालेय स्तरापासून त्यांची तयारी व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन महत्त्वाचे आहे. यातूनच पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अधिकारी निर्माण होतील, असा आशावाद जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे युवा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.
सावंत यांच्या माध्यमातून सावंतवाडी - दोडामार्ग - माजगाव केंद्रासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली. आपल्या जिल्ह्यातून अधिकाधिक विद्यार्थी अधिकारी व्हावेत, यासाठी त्यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र या ध्येयातून विक्रांत सावंत यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून सावंतवाडी, दोडामार्ग व माजगाव या तीन केंद्रांवर शिष्यवृत्ती सराव परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी विक्रांत सावंत यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढविला. गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तूंनी सन्मान करण्यात आला. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक एस. एन. पाटील, मुख्याध्यापिका श्रीम. एस. एस. कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाई, पर्यवेक्षक एन. जी. मुठे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी तर्फे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी सर्वांना अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.










