
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग, अध्यक्षपदी श्री. राजेश वासुदेव कुडाळकर व उपाध्यक्षपदी श्री. वसंतराव मारुती पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर पतपेढी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचारी सभासद आहेत. सर्व शासकीय निमशासकीय विभागातील कर्मचारी सभासद समाविष्ट करणारी ही सिंधुदुर्ग जिल्हयातील संस्था आहे. संस्थेची सन २०२५-२६ ते सन २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल २०२५ मध्ये संपन्न झाली. त्यावेळी १४ सदस्यांची बिनविरोध निवड झालेली होती.
शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी अध्यासी अधिकारी मा.श्री. तुषार धों. राणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून संचालक श्री. प्रसाद नारायण कुंटे यांनी श्री. राजेश वासुदेव कुडाळकर यांचे नाव सुचविले तर संचालक श्री. शंकर अंकुश चव्हाण यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून संचालक श्री. हेमंत प्रतापराव सावंत यांनी श्री. वसंतराव मारुती पाटोळे यांचे नाव सुचविले तर संचालक श्री. लक्ष्मण भरतसिंग वळवी यांनी अनुमोदन दिले. सदर पदांसाठी एक एकच अर्ज आले असल्याकारणाने सदर निवडीला सर्व संचालकांनी मंजुरी दिल्याने अध्यक्ष म्हणून श्री. राजेश कुडाळकर व उपाध्यक्ष म्हणून श्री. वसंतराव पाटोळे यांची अध्यासी अधिकारी श्री. राणे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नुतन अध्यक्ष श्री. कुडाळकर व उपाध्यक्ष श्री. पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व संचालकांना विश्वासात घेवुन संस्थेचे कामकाज सांभाळणार असल्याचे म्हटले. यावेळी उपस्थित संचालक श्री. प्रसाद कुंटे, सौ. विनयश्री पेडणेकर, श्री. संजय गावडे, श्री. दिलीप मसके, श्री. मंगेश राऊत, श्री. अर्जुन नाईक, श्री. दिनकर केळकर, श्री. लक्ष्मण वळवी, श्री. शंकर चव्हाण, श्री. शामराव बिरादार, श्री. हेमंत सावंत, श्री. प्रज्योत सावंत, श्री. उदय शिरोडकर, महेश गावडे, नितीन आरोंदेकर, सचिव रामचंद्र दळवी व कर्मचारी वृंद यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.










