
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियानाचा पहिला टप्पा निरवडे येथे उत्साहात पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून निरवडे मंडळातील आठ गावांमधील शेकडो लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे व योजनांच्या लाभाचे थेट वाटप करण्यात आले. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन आम. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सामान्य जनतेची कामे जलदगतीने व्हावीत आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन श्री. केसरकर यांनी केले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोडल अधिकारी वनिता पाटील पवार, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि निरवडेचे मंडळ अधिकारी सुधीर नलावडे आदींसह आठही गावातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
या शिबिरात निरवडे मंडळातील निरवडे, सोनुर्ली, मळगाव, ब्राह्मणपाट, तळवडे, कुंभारवाडा, बादा आणि नेमळे या आठ गावांमधील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले. शिबिरादरम्यान प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यात शेतकरी दाखले ३३३, प्रलंबित फेरफार नोंदी १४८, उत्पन्न दाखले ५८, सामाजिक आर्थिक सहाय्य योजना १९, जातीचे दाखले १३, अल्पभूधारक दाखले ११, शिधापत्रिका (रेशन कार्ड) ८, वय व अधिवास दाखला ६, लक्ष्मी मुक्ती योजना १ आदी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. एकाच दिवसात ३३३ शेतकरी दाखले आणि १४८ प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शासकीय योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










