
सावंतवाडी : गेल्या २४ तासांत सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान'चे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 'घरपट्टी विमा' योजनेच्या मागणीचा पुनरुच्चार करत राजकीय उदासीनतेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. मसुरकर यांनी गेल्या २५ वर्षांपासून सरकारकडे एक महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. वार्षिक केवळ २०० रुपये 'विमा कर' घरपट्टीतून आकारल्यास, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास घरमालकांना ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. सध्या मिळणारी १० हजार रुपयांची शासकीय मदत अत्यंत तोकडी असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात त्यांनी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांना निवेदनेही पाठवली होती. मात्र, राजकीय उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करत निदान आता तरी या मागणीचा विचार करून जनसामान्यांना दिलासा मिळण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.










