
सावंतवाडी : शहरात रात्री वादळी वाऱ्याने थैमान घालत मोठे नुकसान केले. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. केसरकर यांनी सबनीसवाडा, मोती तलावसह रामेश्वर प्लाझा, श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, इतरवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या नियमाखाली भरपाई दिली जाते. मात्र, काल झालेला प्रकार बघता चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली पंचनामा करून विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या सुचना तहसीलदारांना मी करणार आहे. त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. महावितरणचा खंडित विद्युत पुरवठा देखील लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल तसेच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तळकोकणातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान प्रश्नी पुनश्च लक्ष वेधणार आहे. यापूर्वीही मी त्यांचे लक्ष वेधलं असून सरकारकडून मदत देखील देण्यात येत आहे. मात्र, पावसाचा वाढता जोर अन् नुकसान बघता शेतकऱ्यांना आता अधिकची मदत मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीकडेही लक्ष वेधणार असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
दरम्यान, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, शहरातील नुकसानीची पाहणी आम्ही केली आहे. लोकांना मदत करण्यासाठी आमची टीम तैनात आहे. नगरसेवक नुकसानीची माहीती आम्हाला देत आहेत. महावितरण सोबत बैठक घेत पावसापूर्वी झाडाच्या फांद्या हटविण्यासाठी लक्ष वेधणार आहे. आमदार दीपक केसरकर यांचे आम्हाला सहकार्य लाभत असून पालकमंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असून ते निश्चितच शहरातील लोकांना मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री पंचम खेमराज महाविद्यालयासह शहरात झाड पडून नुकसान झालेल्या भागाची पाहाणी त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, न.प.चे वैभवकुमार अंधारे, दीपक म्हापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.










