
सावंतवाडी : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजवून देणाऱ्या प्राथमिक शिक्षक पतपेढी, शाखा दोडामार्ग येथील सुमारे ५५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि तत्कालीन शाखाधिकारी सुनील भागवत यांच्यासह सर्व संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या दोडामार्ग शाखेत सुमारे ५५ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा ठपका ठेवत तत्कालीन शाखाधिकारी सुनील भागवत आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात दोन स्वतंत्र खटले न्यायालयात चालवले जात होते. आरोपींच्यावतीने ॲड. परिमल नाईक यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही खटल्यांमधील तांत्रिक मुद्दे आणि पुराव्यांचा अभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात बचाव पक्षाला यश आले.
या कायदेशीर लढाईत ॲड. परिमल नाईक यांंना ॲड. विश्राम घोगळे, ॲड. सुशील राजगे, ॲड. रश्मी नाईक,ॲड. अमिषा बांदेकर यांनी सहकार्य केले. दोन्ही खटल्यांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने सुनील भागवत आणि इतर सर्व आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.










