
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील जंगलात एका परप्रांतीय व्यक्तीकडून भेडलं माडाच्या (वनातील मौल्यवान झाड) फ़ांद्या कापून त्या पानांची बिनधिक्कत तस्करी होतं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “दोडामार्गमध्ये एखाद्या स्थानिकाने झाड कापले असते तर वनविभागाने तात्काळ नोटीस बजावली असती. मात्र येथे परप्रांतीय व्यक्तीकडून उघडपणे झाडतोड होत असताना, पानांची राजरोस खुलेआम तस्करी होतं असताना विभागाने दुर्लक्ष केले,” असा आरोप वरक यांनी केलाय.
दरम्यान, कापण्यात आलेल्या झाडाच्या पानांची तस्करी बांदा दोडामार्ग मार्गांवरून खुलेआम होताना निदर्शनास येताच संदेश वरक यांनी स्वतः पुढाकार घेत बांदा-दोडामार्ग मार्गावर संबंधित वाहनांना अडवून ठेवले. त्यांनी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत वनविभागाला तत्काळ माहिती दिली. मात्र, वारंवार संपर्क साधूनही तब्बल दोन तास वनविभागाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वरक यांनी संताप व्यक्त केला. “अशा प्रकारे जर वनसंपत्तीची खुलेआम लूट होत असेल आणि जबाबदार यंत्रणा वेळेत पोहोचत नसेल, तर हा प्रकार गंभीर आहे,” असे ते म्हणाले.
या घटनेमुळे वनसंवर्धनाबाबत प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. एरवी किरकोळ गोष्टीना सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारे येथील वनअधिकारी नेमकं करतातं काय असा सवाल वरक यांनी उपस्थित केलाय.










