
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई दहावी परीक्षेत उत्कृष्ट परंपरा कायम राखत सलग पाचव्या वर्षी 100% निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रशालेत आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मराठी विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या गंधार जोशी, खुशाल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर, वेदांत सावंत - आयटी विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या खुशाल सावंत, सहर्ष धुमाळे, वेदांत सावंत - हिंदी विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या खुशाल सावंत व साहर्ष धुमाळे यांना विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले. सोबतच पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या विषय शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये संपदा राऊळ, प्राची कुडतरकर व दीपिका सर्वेकर यांचा समावेश होता. यावर्षीपासून शाळेत विशेष स्मृती पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विज्ञान, गणित व समाजशास्त्र विषयात उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कुड यशवंत सावंत भोसले स्मृती रोख पारितोषिक’, हिंदी व इंग्रजी विषयासाठी ‘पाय यशवंत सावंत भोसले स्मृती रोख पारितोषिक’ तर मराठी व आयटी विषयासाठी ‘दुर्गाबाई पाय सावंत भोसले स्मृती रोख पारितोषिक’ देण्यात येणार आहे. तसेच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना ‘कुड यशवंत सावंत भोसले स्मृती रोख पारितोषिक’ जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि सहकारी मित्र-मैत्रिणींना दिले. अच्युत सावंत भोसले यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासा कायम ठेवून सतत प्रश्न विचारण्याची सवय जोपासण्याचे आवाहन केले. ले.कर्नल सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान, विशेषतः एआय स्वीकारण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत हे यश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.










