आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक : गटविकास अधिकारी अरुण चव्हाण

Edited by:
Published on: April 20, 2026 20:36 PM
views 34  views

देवगड : गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, स्वच्छता, पोषण आणि सुरक्षित पाणीपुरवठा हे घटक तसेच स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, कुपोषण निर्मूलनासाठी उपाययोजना, माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन महत्वाचे असल्याबाबत मत गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी व्यक्त केले . पंचायत समिती देवगड यांच्या वतीने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन  पंचायत समिती देवगड येथे करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी आणि ग्रामपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 या कार्यशाळेचे उद्घाटन सभापती गणेश राणे ,उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी अरूण चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी  तालुका आरोग्य अधिकारी  डॉ . अजित ढवळे , पंचायत समिती देवगड सदस्य विष्णु घाडी , सादीक डोंगरकर , संजना लाड , समृद्धी चव्हाण , शितल तावडे , सलोनी तळवडेकर , स्नेहा अनभवणे , ऋतुजा खाजणवाडकर , वैद्यकीय अधिकारी , विस्तार अधिकारी आरोग्य गंगुताई अडुळकर , सुनिता धुरी , आरोग्य सहाय्यक मदन मसके आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या कार्यशाळेला सभापती गणेश राणे म्हणाले की आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसुन ती एक सार्वजनिक जबाबदारी आहे .आपल्या जीवनशैलीतील बदल आणि पर्यावरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन , लोकसहभागातुन आरोग्याची एक चळवळ उभी करणे हे या अभियानाचा मुख्य उद्देश असुन“माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले . यावेळी उपसभापती अमोल लोके व पं.स. सदस्य सादीक डोंगरकर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले .

या कार्यशाळेत  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित ढवळे तसेच डॉ . रामानंद घोडके यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना, आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सहभागींना “आरोग्य संपन्न गाव” संकल्पना राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत माहिती  तसेच गावनिहाय आरोग्य स्थितीचे विश्लेषण करून समस्यांची ओळख व त्यावरील उपाययोजना निश्चित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे गावागावांत आरोग्यविषयक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय डिजिटल माध्यमांचा वापर करून आरोग्य माहितीचा प्रसार कसा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये उपस्थितांनी विविध शंका मांडल्या व तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन करण्यात आले. सर्वांनी स्वच्छता, आरोग्य व पोषण यासंदर्भात सातत्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यशाळेत प्रस्तावणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अजित ढवळे , सुत्रसंचलन व आभार तालुका समुह संघटक स्वप्नील झोरे यांनी मानले .